पुणे जिल्हा | यूरिया टंचाईने पूर्व हवेलीतील शेतकरी हैराण

सोरतापवाडी, (वार्ताहर) – पूर्व हवेलीतील गावांमध्ये बाजरीचे क्षेत्र पावसावरती अवलंबून असून, पाच ते सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पिके जोमात असून शेतकरी आनंदी आहेत; मात्र सध्या पिकांना यूरियाची देण्याची गरज असताना तो मात्र मिळत नसल्याचे चित्र पूर्व हवेलीतील अनेक गावात पाहावयास मिळत आहे.
पूर्व हवेलीत जून महिन्यात पडलेल्या थोड्या पावसावर काही ठिकाणी पेरणी झाली तर काही ठिकाणी जुलै महिन्यात पेरण्यांना सुरुवात झाली. पूर्व हवेलीत पावसाची संततधार सुरू असून शेतकरी शेतीची कामे करण्यात गुंतला असून, बाजरी, मका व इतर खरीप पिके खुरपणी करुन यूरिया टाकण्याची तयारी करत आहे; पण यूरिया मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
पूर्व हवेलीचा भाग तसा बागायती मुळामुठा कालवा, जुना कालवा व नदी यामुळे बागायती क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे; पण मागील वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन्ही कालवे आटले होते व नदीला सुद्धा एखाद्या वड्याचे स्वरूप आले होते; पण आता पडत असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती बदलली असून खरी खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकर्यांची लगबग वाढली आहे. पण ऐन खरीप हंगामात यूरिया या खताची टंचाई जाणवू लागली आहे. काही ठिकाणी आता खरीप पिके जोमात असून आता पिकांना यूरिया खताची गरज आहे.
तर काही ठिकाणी भाजीपाल्याला सुद्धा यूरियाची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून यूरियाची टंचाई निर्माण केली जात असल्याची शंका शेतकर्यांना आहे. यूरियाच्या नावाखाली इतर खते घेण्यासाठी दुकानदार जबरदस्ती करत आहेत तसे दुकानदार शेतकर्यांना सांगत आहेत की कंपनीकडूनच आम्हाला यूरिया बरोबर इथे इतर खते जबरदस्तीने दिले जात आहेत.
यूरिया बरोबर नॅनो युरिया लिक्विडची बाटली घेणे बंधनकारक करत असून पावसावरती अवलंबून असलेल्या पिकासाठी ही नॅनो यूरिया काय कामाची, असे शेतकरी प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे युरिया टंचाईने शेतकरी मात्र हतबल झाले आहेत.
जादा दराने व शक्तीने लिंकिंगद्वारे यूरिया विक्री केल्यास संबंधित खत विक्रेत्यावर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हास्तरीय पथकाने कुंजीरवाडी परिसरातील खत विक्रेत्यांची तपासणी केली असून पूर्व हवेलीतील इतर सर्व दुकानदारांची भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
कुठल्याही दुकानदारांनी शेतकर्यांची अडवणूक करू नये. खत विक्री करताना कोणताही दुजाभाव न करता सर्व येणार्या शेतकर्यांना उपलब्धतेनुसार खते विक्री करणे बंधनकारक आहे.
तसे न केल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकर्यांनी अशा दुकानदारांची नावे व माहिती कृषी विभाग पंचायत समिती हवेली यांच्याकडे पाठवावी शेतकर्यांची नावे गुपित ठेवली जातील. याची जबाबदारी कृषी विभाग घेईल. -सुमित शिंदे, कृषी अधिकारी हवेली पंचायत समिती
कठोर कारवाई करणार का?
येथील शेतकरी भाऊसाहेब चौधरी हे उरुळी कांचन येथे 18:46 या खताच्या दोन पिशव्या घेण्यासाठी गेले असता तेथे खते संपली आहे असे सांगण्यात आले. परंतु चौधरी हे थोडेसे दुकानापासुन बाजूला जाऊन उभे राहिले असता दुसर्या एका शेतकर्याने 18:46 ही खताची बॅग त्यांच्या समोरून त्याच दुकानातून घेऊन गेले.
मग खताची दुकाने हे जिथून औषधे घेतो त्या शेतकर्यांसाठीच आहेत का, असा सवाल चौधरी यांनी केला. शेतकर्यांना कुठल्यापण खताच्या दुकानातून औषधे व खते देणे बंधनकारक असून सुद्धा अनोळखी शेतकर्यांना खते मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.





