Farmers Loss | चाळीतच कांदा सडला ; बाजारभावाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना पडली महागात!

प्रभात वृत्तसेवा
मंचर – भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने शेतकरी निराश झाले आहेत. सडलेला कांदा फेकून देण्याचाही खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कांदा सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा उकीरड्यावर फेकून दिला आहे.बाजारभाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र, अपेक्षाभंग झाला आहे. शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यावर आधारित हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची फरपट होत आहे.
खराब झालेला कांदा फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. बागायत पट्ट्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून पुढील पिकासाठी भांडवल उभारणेही कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे हमीभावाचा कायदा त्वरीत लागू करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
“कांद्याचे भाव वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी साठा केला होता. पण चाळीतील कांदा सडला. मोठ्या खर्चानंतरही काहीच फायदा होत नाही. हमीभावाशिवाय शेतकऱ्यांचा जीव वाचणे अवघड आहे.”
– शाम गुंजाळ,उद्योजक, लांडेवाडी.
“सध्या बाजारात कांद्याची मागणी कमी आहे. शेतकरी अपेक्षेने माल रोखून ठेवतो, पण शेवटी सडल्यामुळे तोटा सोसावा लागतो. भाव स्थिर राहण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.”
-वसंतराव आणि चंद्रकांत थोरात, कांदा व्यापारी, मंचर.




