Pune News : साडेसतरानळी येथील शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; अमनोरा पार्क टाऊनशिपमधील प्रलंबित प्रश्नांवर शेतकऱ्यांची बैठक
Pune News : याशिवाय सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामे, नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणे, रोड मार्जिन, अनधिकृत वृक्षतोड मुद्देही बैठकीत उपस्थित करण्यात आले.

हडपसर : साडेसतरानळी येथील अमनोरा पार्क टाऊनशिपशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर शेतकरी, ग्रामस्थ आणि टाऊनशिपमधील काही रहिवाशांची संयुक्त बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली.
येथे विकसित होत असलेल्या या टाऊनशिपच्या विकासादरम्यान शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ तसेच रहिवाशांना देण्यात आलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसल्याची खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.
या बैठकीस हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप तुपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व भाजपचे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे, नगरसेविका सारिका घुले, माजी उपसरपंच विलास तुपे, योगेश तुपे,सुनील तुपे, नारायण तुपे, सुधीर तुपे, भाऊ तुपे, लक्ष्मण तुपे, बापू तुपे, रवी भुजबळ, नंदू भुजबळ, अतुल बहिरट, अमोल बहिरट, नंदू बहिरट, महेश तुपे, अश्विन तुपे, मिलिंद तुपे, बबलू तुपे, प्रसाद तुपे, तुषार तुपे, नवनाथ तुपे, तात्या तुपे, निलेश तुपे,सतीश तुपे ,तुषार घुले आदीजण उपस्थित राहिल्याचे अमोल तुपे यांनी सांगितले.
बैठकीत शेतकऱ्यांच्या जमीन व्यवहारांशी संबंधित प्रश्न, अपूर्ण राहिलेले सातबारा उतारे,स्थानिकांना रोजगाराची आश्वासने, सरकारी व पाटबंधारे विभागाच्या जमिनींचे प्रश्न, ओढ्यांवरील बांधकामे, गावाच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा तसेच गावाच्या विकासासाठी सीएसआर निधीचा वापर न झाल्याबाबत चर्चा झाली.
याशिवाय सरकारी जमिनींवरील अनधिकृत बांधकामे, नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणे, रोड मार्जिन, अनधिकृत वृक्षतोड मुद्देही बैठकीत उपस्थित करण्यात आले. शेतकरी, ग्रामस्थ आणि रहिवाशांचे समान हक्क संरक्षित करून अपूर्ण आश्वासने पूर्ण करण्यासाठी तसेच कायदेशीर व लोकशाही मार्गाने संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आल्याचेही तुपे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत अमनोरा पार्क टाऊनशिप व्यवस्थापनाचे म्हणणे घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे म्हणणे देण्यास नकार दिला आहे.
आमच्या साडेसतरानळी गावात ही अमनोरा पार्क टाऊनशिप सुरू होताना.कंपनीने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. त्यातील काही आश्वासने त्यांनी पूर्ण केली .परंतु पुढे वेळोवेळी काही कारणे देऊन ती पाळली नाहीत.आजही अनेक प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे आता आम्हीं आमच्या न्याय हक्कासाठी मोठे आंदोलन करणार आहोत. त्याच्या पूर्व तयारीसाठी नुकतीच ही बैठक घेण्यात आली होती.
संदीप तुपे, भूषण तुपे, अमोल तुपे
स्थानिक शेतकरी, साडेसतरानळी





