शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपचा खेळ बिघडवणार

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेवर पश्चिम उत्तर प्रदेशातून 50 आमदार निवडून जातात. या भागात प्रामुख्याने जाट समुदायाचा दबदबा आणि पारंपरिक वर्चस्व राहीले आहे. विशेषत: त्यांचा ज्यांना पाठिंबा असतो त्यांचा सत्तेचा मार्ग प्रशस्त होतो. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जाटांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. त्याचा या पक्षाला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यास लाभ झाला. मात्र शेतकरी आंदोलनामुळे हा समाज भाजपासून दुरावण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
दिल्लीतील आंदोलनात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले आहेत. त्यात जाटांची संख्या लक्षणीय आहे. हे जाट सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपचे राज्यातील योगी सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार अडचणीत येउ शकते. भाजपवरच्या त्यांच्या नाराजीचा लाभ उठवण्यासाठी आता सगळेच विरोधी पक्ष सक्रिय झाले असून त्यात अजित सिंह यांचा पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचा समावेश आहे.
वास्तविक 26 जानेवारीच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन गुंडाळले गेल्यातच जमा होते. मात्र राकेश टिकैत यांच्या अश्रुंनी हवा फिरवली. परतीच्या मार्गावर असलेले शेतकरी पुन्हा माघारी फिरले आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यामुळेच या पक्षाने आता आपल्या सगळ्याच प्रमुख जाट नेत्यांना सरकारची बाजू मांडण्यासाठी मैदानात उतरवले आहे. प. उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात जाउन आता पक्षाची भूमिका आणि आंदोलन याबाबत जाट समुदायाला विश्वासात घेण्याची सरकारची योजना आहे.





