पिंपरी | वादळी वाऱ्यांने उडविली शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट

नाणे मावळ, (वार्ताहर) – नाणे मावळ व तालुक्यामध्ये शनिवार पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. बाजरी, ज्वारी, आंबा, कलिंगड, गहू, कांदा, अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाढत्या उकाड्यासून हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा दिला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह. मावळ तालुक्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचे असलेले सावट काहीसे कमी झाले आहे. मात्र दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
फळ उत्पादक शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांमुळे कैऱ्यां गळून पडल्या आहेत. उरलेल्या कैऱ्यांवर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराई पसण्याची भिती आहे.
नाणे गावात वादळी वाऱ्यांमुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे गहू, बाजरी, काकडी, कांदा, भाजीपालासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमालाला भाव नसल्याने एकीकडे शेतकरी बेजार झाला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे संकट निर्माण झाले आहे.





