Farmer Suicides : चार महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी संपवले जीवन, मंत्री म्हणतात…

Farmer Suicides – यंदा जानेवारी 30 एप्रिलपर्यंतच्या 4 महिन्यांच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे राज्यातील 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवली,
अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली. त्यांनी यावेळी बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली.
दानवे म्हणाले, मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये वाटप होणे अद्याप बाकी आहे. सरकार पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे.
हे अन्यायकारक आहे. आम्ही या विरोधात आवाज उचलणार आहोत. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली. पण त्यानंतरही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
दानवे पुढे म्हणाले, केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला 2023 – 24 मध्ये 36 हजार कोटींचा निधी मिळाला. तो 2024 -25 मध्ये 31, 830 कोटी रुपयांवर घसरला. त्यामुळे डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरी मिळते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूरहून रूग्णवाहिका आणावी लागली. यावरूनही दानवे यांनी राज्यातील एकूण एमआयडीसींच्या सुरक्षा व उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले.
गुत्तेदारांचे साम्राज्य करण्याचा प्रयत्न
जनतेचा विरोध असतानाही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यात गुत्तेदारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असे ते म्हणाले.





