पुणे – शहरात गेली दहा दिवस संपूर्ण भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज (दि. 28) निरोप देण्यात येणार आहे. सकाळी 10:00 वाजल्यापासून शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार असून सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व मंडळे आणि महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी या मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे.
शहर गेल्या दहा दिवसांत बाप्पामय होते. गणेशाच्या आगमनानंतर दोनच दिवसांनी गौरींचेही आगमन झाले, त्यांना 23 तारखेला निरोप देण्यात आला. अनेकांच्या घरी गौराई येत असल्याने अशी कुटुंब देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत नाहीत. परंतु, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीच गौरींचे विसर्जन झाल्यामुळे पुढील तब्बल पाच दिवस देखावे पाहण्यासाठी मिळाले. शहरात यंदा राममंदिर आणि देशातील विविध प्रसिद्ध मंदिरांचा देखावा हा भाग आकर्षणाचा होता. याशिवाय मानाच्या पाच गणपतींशिवाय अन्य प्रसिद्ध गणपतींचे देखावे पाहण्यासाठीही प्रचंड गर्दी झाली.
मंडईतील टिळक पुतळ्यापासून प्रारंभ…
मंडईतील टिळक पुतळ्यापासून गुरुवारी सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमाराला मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याला लागेल. या मंडळांनी त्यांचे नियोजनही जाहीर केले आहे. हेच अन्य प्रसिद्ध गणपती मंडळांचेही नियोजन असून, त्यांनी या आधीच हे जाहीर केले आहे.
कडक पोलीस बंदोबस्त…
पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला असून मिरवणूक मार्गांना जोडणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. रात्री उशिरा या रस्त्यांवर बांबूंचे बॅरीकेडींग करण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेनेही गणपती विसर्जनासाठी विसर्जन हौद आणि निर्माल्य कलशांची सोय केली आहे. याशिवाय नदीपात्रात लाईफगार्ड आणि अन्य सुरक्षेचे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- सकाळी 10:00 वाजता मिरवणुकीस सुरुवात
- 9 हजार पोलिसांचा पहारा
- 300 पेक्षा अधिक ठिकाणी विसर्जनाची सुविधा
- 150 फिरते हौद
- 21 ठिकाणी पार्किंगची सुविधा
- 11 प्रमुख रस्त्यांवर पार्किंगला बंदी
- 1500 स्वच्छता कर्मचारी
- नदीपात्रात विसर्जनास बंदी
- मानाच्या गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात
- अग्निशमनदलाचे 128कर्मचारी नदीवर तैनात