Family Court Pune : बायको स्पर्धा परीक्षा देतेय? मग खर्चही द्यावाच लागेल! कौटुंबिक न्यायालयाचा पतीला मोठा दणका
Family Court Pune : राहणीमान, फी आणि अभ्यास साहित्याचा खर्च पतीलाच उचलावा लागणार; कौटुंबिक वादात सापडलेल्या पत्नीला मोठा दिलासा.

Family Court Pune – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दैनंदिन खर्चासाठी पतीने दरमहा ३० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. खान यांनी दिला आहे. या प्रकरणात पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद व कौटुंबिक वादामुळे विभक्त राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर पत्नीने पोटगीसाठी अर्ज केला होता.
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते की, ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून तिच्याकडे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नाही. राहणीमान, अभ्यास साहित्य, फी आणि इतर दैनंदिन खर्च भागविणे कठीण जात असल्याने पतीकडून आर्थिक साहाय्य देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने केली होती. तसेच, पतीकडून आवश्यक खर्चासाठी पुरेशी मदत मिळत नसल्याचेही तिने अर्जात नमूद कले होते.
पत्नीने ॲड. सोनाली आरू-नवस्कर, ॲड. प्राची जमदाडे-कोल्हे, ॲड. अजय मोहेळ आणि दीपाली अडसूळ यांच्यमार्फत हा अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने पतीचे उत्पन्न, पत्नीची शैक्षणिक, आर्थिक गरज आणि तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत दरमहा ३० हजार रुपये पोटगी मंजूर केली. ही रक्कम पत्नीच्या शिक्षणासह तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.





