Pune : गड-किल्ल्यांचा इतिहास फॅशनच्या रॅम्पवर; ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया 2026’ संपन्न
Pune : पुण्यात ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा सोहळा उत्साहात पार पडला. २१ गड-किल्ल्यांचा इतिहास, मराठमोळी संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाचे दर्शन फॅशन शोमधून घडले.

Pune : महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि गड-किल्ल्यांचा सांस्कृतिक वारसा फॅशनच्या माध्यमातून सादर करणारा ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६ – सीझन ५’ हा सोहळा बाणेर येथील बंटारा भवन येथे उत्साहात पार पडला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने तसेच मृणाल्स एंटरटेनमेंट आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या फॅशन शोमध्ये महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील ११ गड-किल्ल्यांसह अन्य १० ऐतिहासिक किल्ल्यांचा, अशा एकूण २१ गड-किल्ल्यांचा इतिहास सादर करण्यात आला. स्पर्धकांनी पारंपरिक वेशभूषा, ऐतिहासिक संदर्भ आणि रॅम्प वॉकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून दिली. या संकल्पनेची निर्मिती मृणाल्स एंटरटेनमेंटच्या संस्थापिका मृणाल सुमित गायकवाड यांनी केली.
कार्यक्रमाला चंद्रकांतदादा पाटील, ओमप्रकाश शेटे, संदीप मोहिते पाटील, सौजन्या निकम आणि प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत रिद्धिमा पांडे, प्रिया पाटील, ऐश्वर्या कुमार, अनुपम विश्वकर्मा, प्रीणिता पाडळकर, दीप्ती पापरकर, अक्षया पिंजरकर आणि ऋग्वेदा निंबाळकर यांनी विजेतेपद मिळवले. जया पाठक, इंद्रायणी गांगुर्डे, अश्विनी थोरात आणि हर्षदा जाधव यांची हेरिटेज स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अभ्यंग कुवळेकर, मीनल टिपसे, मेघना कुंटे आणि हर्षा बनसोडे यांनी केले. अवधुत गांधी आणि गौरी वानरसे यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सनीज वर्ल्ड, वैशाली भागोडिया, प्राची सिद्धिकी, जयेश पाटील, अनिकेत मेकओव्हर, सुहान ज्वेल्स, बिग एफएम, मिवा ज्वेलर्स, रीका फूड, वस्त्र वेड आणि तनु डिझायनर यांचे सहकार्य लाभले. मयूरी पवार, रविना शाह, हर्षल मराठे आणि सुमित गायकवाड यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.
या वेळी प्रकाशतात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, प्रमोद निम्हण, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, वंदना सिंग, सचिन दळवी, वैदेही बापट, स्वप्नाली सायकर, ज्योती कलमकर, निकिता माथाडे, अनिकेत चांदरे, स्मृती जैन आणि जागृती विचारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
“आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचा वारसा फॅशनच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे, तसेच महिलांना त्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवण्यासाठी व्यासपीठ देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे,” असे मृणाल सुमित गायकवाड यांनी सांगितले.
ऐतिहासिक वारसा, मराठमोळी संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक फॅशन यांचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला आधुनिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.





