Fake Security Agencies – झपाट्याने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात गृहनिर्माण सोसायट्या आणि औद्योगिक वसाहतींची संख्या वाढत असताना बोगस सुरक्षा एजन्सींचा सुळसुळाट झाल्याचे चित्र समोर येत आहे. सुरक्षा रक्षकांकडूनच चोरी अथवा चोरट्यांना मदत केल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘सुरक्षा देणाऱ्यांवरच संशय’ अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. सुरक्षा एजन्सी सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी, आवश्यक नोंदणी आणि परवाना बंधनकारक असतो. रक्षकांची आधार, पॅन कार्ड, फोटो, पोलीस पडताळणी, गणवेश व ओळखपत्र अनिवार्य असते. मात्र, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव तसेच उच्चभ्रू सोसायटी आणि एमआयडीसी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये कार्यरत असलेल्या रक्षकांकडे मूलभूत कागदपत्रे नसल्याचे दिसून येते. काही जणांची पोलीस पडताळणीही झालेली नाही. कमी दरात सुरक्षा देण्याचे आमिष दाखवून काही एजन्सी थेट सोसायटी पदाधिकाऱ्यांशी करार करतात. रक्षकांना केवळ एक शर्ट देऊन ‘गणवेश’ पूर्ण झाल्याचा दिखावा केला जातो. ड्युटीवर झोपलेल्या रक्षकांचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.२०२० मध्ये वाढत्या चो-या लक्षात घेत वाकड पोलिसांनी ‘माझी सोसायटी, माझी सुरक्षा’ हा उपक्रम राबवला होता. यामध्ये मध्यरात्री अचानक तपासणी केली असता सुमारे ७० टक्के रक्षक झोपेत आढळले होते. सोसायट्यांनी घरमालक, भाडेकरू यांची माहिती, एजन्सीचा परवाना क्रमांक, रक्षकांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या उपक्रमाकडे नंतर दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक कामांसाठीही वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रक्षकांचे मुख्य कर्तव्य दुय्यम ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गृहनिर्माण संस्था शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियमित गस्त वाढवून सोसायट्यांशी समन्वय साधावा, अशी मागणी होत आहे. सोसायटी गेटवर गस्तीची नोंदवही ठेवून पोलिसांच्या भेटीची नोंद करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा, बोगस एजन्सींमुळे शहराची सुरक्षा व्यवस्थाच प्रश्नचिन्हाखाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकानेच जागते रहो… शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक सुरक्षा रक्षक असतात. यातील एक सुरक्षा रक्षक जागा राहतो तर दुसरा झोपी जातो. काही वेळाने जागा असलेला सुरक्षा रक्षक आपल्या सहकारी मित्राला झोपेतून उठवून तो स्वतः झोपी जातो. एखाद्या वेळी जर झोपल्याचे पकडले गेल्यास आज तब्बेत ठीक नसल्याने गोळी खाल्ली आणि त्यामुळे झोप आल्याचे सांगितले जाते. सुरक्षा रक्षकांमध्ये परप्रांतीयांचे प्रमाण अधिक शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी परप्रांतियांचे प्रमाण अधिक आहे. कागदपत्र नसल्याने अनेकजण कमी पैशात नोकरी करतात. अशावेळी एखादा गंभीर गुन्हा घडल्यास सुरक्षा रक्षक एजन्सीकडे आरोपी सुरक्षा रक्षकाबाबत कोणतीही माहिती नसते. दोन ठिकाणी काम अनेक सुरक्षा रक्षकांना अपुरा पगार असतो. तसेच दीर्घ कामाचे तास यामुळे अनेक रक्षक दोन ठिकाणी पाळ्या करतात. सकाळी एका ठिकाणी आणि रात्री दुस-या ठिकाणी काम करतात. दिवसभराच्या कामाच्या थकव्यामुळे अनेक सुरक्षा रक्षक रात्री साडेबारा वाजल्यानंतर झोपी जातात.