Fake Football Team : अजब पाकिस्तानी गजब कारनामे, जपानला जाण्यासाठी बनवली खोटी फुटबॉल टीम, विमानतळावर अटक!

काय आहे प्रकरण?
पाकिस्तानमधील २२ जणांचा हा बनावट फुटबॉल संघ जपानमध्ये प्रशिक्षणाच्या नावाखाली अवैधरित्या प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. जपानी अधिकाऱ्यांना विमानतळावर कागदपत्रांवर संशय आल्याने त्यांनी या संघाची चौकशी केली. चौकशीतून असे समोर आले की, हे सर्वजण खोट्या कागदपत्रांच्या आधारे फुटबॉल खेळाडू बनून जपानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी संपूर्ण संघाला ताब्यात घेऊन डिपोर्ट केले आणि पाकिस्तानी तपास यंत्रणा (FIA) ला याची माहिती दिली.
मानव तस्करीचा कट –
Fake football team of 22 from Pakistan lands in Japan for a fake tournament, with forged papers. pic.twitter.com/H7tYaLs4rb
— Omkara (@OmkaraRoots) September 17, 2025
माध्यमांच्या वृत्तानुसार, हा प्रकार मानव तस्करीशी जोडलेला आहे. तस्करांनी प्रत्येक व्यक्तीकडून सुमारे ४० लाख रुपये घेऊन त्यांना जपानला पाठवण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी ‘गोल्डन फुटबॉल ट्रायल’ नावाच्या बनावट फुटबॉल क्लबाची नोंदणी करण्यात आली होती. या प्रकरणी पाकिस्तानच्या संघीय तपास यंत्रणेने (FIA) १५ सप्टेंबर रोजी मलिक वकास नावाच्या व्यक्तीला अटक केली. वकासने सियालकोट विमानतळावरून या २२ जणांच्या बनावट संघाला जपानला पाठवले होते.
हेही वाचा – Varun Chakravarthy : वरूण चक्रवर्तीची कमाल! ICC च्या ‘या’ क्रमवारीत पटकावलं नंबर वन स्थान
बनावट कागदपत्रे आणि खोटे प्रशिक्षण –
या फसवणुकीसाठी तस्करांनी कसून तयारी केली होती. संशय टाळण्यासाठी या व्यक्तींना फुटबॉल खेळाडूसारखे प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, वकासने पाकिस्तान फुटबॉल महासंघाचा (PFF) बनावट नोंदणी पत्र आणि परराष्ट्र मंत्रालयाचा खोटा अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) तयार केला होता. मात्र, जपानी अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रे तपासली आणि त्यातील फसवणूक उघड झाली.
जपानची पाकिस्तानला चेतावणी –
जपान सरकारने या प्रकरणानंतर पाकिस्तानला कडक चेतावणी दिली आहे. जपानी अधिकाऱ्यांनी असे कृत्य पुन्हा घडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, FIA ने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, मानव तस्करीच्या या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पाकिस्तानची पुन्हा बदनामी –
या घटनेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. बनावट कागदपत्रे आणि मानव तस्करीच्या या प्रकरणाने जपानसारख्या देशातही पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. FIA आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर संशयितांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.





