Fake Doctors In Alephata: नावापुढे ‘डॉक्टर’ लावून रुग्णांची फसवणूक; आळेफाटा परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
Fake Doctors In Alephata: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मान्यता नसतानाही नावापुढे 'डॉक्टर' लावून रुग्णांची आर्थिक लूट; सामान्य नागरिकांच्या जीविताला मोठा धोका.

Fake Doctors In Alephata – परिसरात परवानाधारक नसलेल्या तोतया डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. “संधीवात बरा होईल”, “मणक्याचे उपचार”,”मूळव्याधीवर हमखास इलाज”, “सर्व दुखण्यांवर उपचार” अशा आकर्षक आणि संदिग्ध पाट्या लावून अनेक जण नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे. कोणताही कायदेशीर वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार करून आर्थिक लूट तर केली जात आहेच, पण नागरिकांच्या आरोग्याशीही गंभीर खेळ सुरू असल्याची चर्चा आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मान्यताप्राप्त पदवी नसतानाही काही जण आपल्या नावापुढे “डॉक्टर” ही उपाधी लावत खुलेआम वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याबरोबरच त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील तब्बल १३ तोतया डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतरही अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसलेला नसल्याचे दिसून येत आहे. आळेफाटा परिसरात नागरिकांच्या तक्रारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर एका तोतया डॉक्टरावर कारवाई करण्यात आली होती. संबंधित व्यक्तीकडे बीईएमएस (इलेक्ट्रोपॅथी) पदवी असतानाही नावापुढे “डॉक्टर” लावून वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचे आढळले होते. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मान्यता नसताना नाडी परीक्षण करून औषधे देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाईची मागणी होत आहे.
इलेक्ट्रोपॅथी, नॅचरोपॅथी यांसारख्या शाखांतील पदवीधारकांना नावापुढे “डॉक्टर” ही उपाधी वापरण्याची किंवा अॅलोपॅथीची औषधे देण्याची परवानगी नाही. ते केवळ त्यांच्या संबंधित उपचारपद्धतीनुसारच सेवा देऊ शकतात. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि डीएचएमएस अशा मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवीधारकांनाच नियमानुसार वैद्यकीय उपचार करण्याचा अधिकार आहे.
परिसरात वाढत चाललेल्या तोतया डॉक्टरांच्या प्रकारामुळे आरोग्य विभागाने पुन्हा विशेष मोहीम राबवून अशा बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची पदवी, नोंदणी क्रमांक आणि वैद्यकीय परवाना तपासण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.




