Maharashtra politics : फडणवीसांनी पवारांच्या विश्वासू नेत्याला हेरलं; भाजप प्रवेशाची तारीख आली समोर; विधानपरिषदेवर जाणार असल्याची चर्चा
Maharashtra politics : या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव असल्याची चर्चा आहे. तनपुरे हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असून त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra politics : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपाने 12 जागांवर दावा ठोकला असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ चार जागांवर समाधानी नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पुण्यातील जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघेही दिल्लीत दाखल होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार आहे.
दरम्यान, भाजपाकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणीही वेगाने सुरू आहे. 12 जागांसाठी तब्बल 48 नावांची चर्चा पक्षात सुरू असून प्रत्येक जागेसाठी चार नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ही यादी घेऊन भाजप नेते रवींद्र चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असून त्यानंतर अमित शाहांसोबत उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे.
या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव असल्याची चर्चा आहे. तनपुरे हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असून त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३० मे ला साथ सोडणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे भाजपामध्ये जाहीर प्रवेश करू शकतात. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आणखी एका मोठ्या नेत्याचाही भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तनपुरे भाजपमध्ये गेल्यास शरद पवार गटाला हा मोठा धक्का असणार आहे.
याआधी राहुरी पोटनिवडणुकीवेळीही तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राम शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या भेटी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ते भाजपकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात होतं. मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला.
प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा विजय मिळवला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. शहरी विकास, ऊर्जा आणि आदिवासी विकास ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. विशेष म्हणजे ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत.




