Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला तडीपारीची नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…गुन्हे केले तर

Devendra Fadnavis : जालना जिल्ह्यातील नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. काल जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली असून त्यांना सहा महिन्यांसाठी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गुन्हे केले तर अटक होणार : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचा साला आहे, कोणाला नातेवाईक आहे, याच्यावर कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
…तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही.
तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशाराच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
यांच्यावर झाली तडीपारीची कारवाई
1) विलास हरिभाऊ खेडकर 2) अमोल केशव पंडित 3) केशव माधव वायभट 4) गजानन गणपत सोळुंके 5) संयोग मधुकर सोळुंके 6) वामन मसुरराव तौर 7) संदीप सुखदेव लोहकरे 8) रामदास मसूरराव तौर 9) गोरख बबनराव कुरणकर.





