Eye on hospitals ; पुण्यातील ९५० खासगी रुग्णालयांवर वाॅच!
Eye on hospitals ;

दरपत्रक ठळकपणे न दर्शविल्यास होणार कारवाई
Eye on hospitals ; खासगी रुग्णालयांना सेवासुविधांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च आणि विविध वैद्यकीय सेवांचे दर रुग्णांना सहज समजावेत, यासाठी हे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार पुणे शहरातील सुमारे ९५० नोंदणीकृत खासगी रुग्णालयांनाही हा नियम लागू होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्णयानुसार, रुग्णालयांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये दरपत्रक लावावे लागणार आहे. अन्यथा प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत. मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली, २०२१ मधील अनुसूची तीननुसार सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करावे लागतील.
रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरजवळ रुग्णांना सहज दिसेल, अशा ठिकाणी दरपत्रक लावणे आवश्यक आहे. उपचारांचे दर किंवा सेवा शुल्कामध्ये बदल झाल्यास दरपत्रक तातडीने अद्ययावत करावे लागणार आहे. तसेच, विविध उपचार पॅकेज आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहितीही रुग्णांना उपलब्ध करून द्यावी लागेल.
दरपत्रकामुळे उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णांना संभाव्य खर्चाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बिलिंगच्या वेळी होणारे गैरसमज आणि शुल्काबाबतच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. दरप्रदर्शनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची संबंधित क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी तपासणी होणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील संबंधित आरोग्य यंत्रणांना या नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी लागणार आहे.
पुणे महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. रुग्णालयांना आपण या पूर्वीच सूचना दिलेल्या आहेत. त्या बाबत क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची पाहणी होणार आहे. पुणे महापालिका याबाबत लक्ष ठेवून आहे.
– सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी





