ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार; मजूर, वाहतूकदारांच्या मनमानीला लगाम

पुणे – ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याकडे रोख बक्षीस, मांसाहाराचे जेवण अथवा मद्याची मागणी करणे, ऊसाची तोडणी व्यवस्थित न करणे, हलगर्जीपणे ऊस पेटविणे, तोडलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यालाच ट्रॅक्टर मागणे अशा विविध अनुचित प्रकारांना पायबंद घालण्यासाठी साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या अभ्यासगटाची नियुक्ती केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने साखर कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतुकीची रक्कम मजुरांना व वाहतुकदाराला दिली जाते. तरीही मजूर व वाहतुकदारांकडून शेतकऱ्यांना त्रास देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. या अनुचित प्रकारांना कशा प्रकारे पायबंद घालता येईल, याचा अभ्यास या गटाकडून केला जाणार आहे.
साखर संचालक उत्तम इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या अभ्यासगटाला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. हा अभ्यासगट ऊस तोडणीच्या प्रचलित व्यवस्थेचा आढावा घेऊन, त्यातील अनुचित प्रकारांना पायबंद घालण्यासाठी कायदे, नियम व करारात तरतुदी सुचविणार आहे. त्यानुसार नियमावली अथवा आराखडा सादर केला जाणार आहे.





