Maharashtra transporters strike – मनमानी आणि अतिरेकी ई-चलान तसेच वाहतूक करताना भेडसावणाऱ्या इतर समस्यांविरोधात वाहतूकदारांनी राज्यव्यापी चक्का जाम सुरू केला असून, गुरूवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे राज्याच्या दळणवळण व्यवस्थेवर याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्र परिवहन आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत तोडगा न निघल्याने महाराष्ट्र परिवहन कृती समितीने संपाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून ई-चलन प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक दोष असल्याचे दावे वाहतूकदारांकडून केले जात आहेत. चुकीच्या पद्धतीने आकारले जाणारे दंड आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायावर आर्थिक संकट कोसळल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदन देऊनही शासनाने ठोस पावले न उचलल्याने अखेर संपाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख औद्योगिक व व्यावसायिक केंद्रांना बसला आहे. मुंबईत ट्रक आणि टेम्पोची चाके थांबल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच औद्योगिक पट्ट्यांमध्ये कच्च्या मालाची ने-आण पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी संतप्त वाहतूकदारांनी ‘रास्ता रोको’ करून आपला निषेध नोंदवला. यामुळे प्रवाशांना आणि खासगी वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एमएसआरटीसी मुख्यालयात वाहतूकदारांसोबत बैठक घेतली होती. सरनाईक यांनी वाहतूकदारांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. पार्क केलेल्या वाहनांना दिले जाणारे अन्याय्य ई-चलान रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि या विषयावर अनुकूल निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले होते.