सवलतीत मिळकतकर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

पुणे – महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षांचा मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी सायंकाळी काढले. त्यामुळे नागरिकांना आता आणखी महिनाभर करात मिळणारी सवलत मिळणार आहे.
या मुदतवाढीच्या ठरावास स्थायी समितीने मागील महिन्यातच मान्यता दिली होती. मात्र, मुख्यसभेची मान्यता नसल्याने हा निर्णय प्रलंबित होता. अखेर रविवारी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी “मुख्यसभा मान्यता देणार असून त्यासाठी मान्यता द्यावी,’ अशा सूचना आयुक्तांना केल्या होत्या. नागरिकांनी मिळकतकर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जमा करावा, या उद्देशाने महापालिका एप्रिल आणि मेमध्ये कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत देते. त्यात, सर्वसाधारण कर 25 हजारांपेक्षा कमी असल्यास 10 टक्के वर 25 हजारांपेक्षा जास्त असल्यास 5 टक्के सवलत दिली जाते.
मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व शासकीय कार्यालये बंद होती. त्यातच, बिलांचे वाटपही करता आलेले नव्हते. त्यामुळे पालिकेने नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यासाठी मेसेज तसेच लिंक पाठविण्यात आली होती. मात्र, त्याला दरवर्षीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, 10 मे पासून शहरात पालिकेने करसंकलनासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू केल्याने नागरिकांकडून मागील दहा ते पंधरा दिवसांत कर भरण्यास सुरुवात केली होती. तर 31 मे रोजी सवलीत कर भरण्यासाठी 30 आणि 31 मे रोजी नागरिकांच्या करभरणा केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
150 कोटींची तूट
एप्रिल आणि मेमध्ये पालिकेच्या तिजोरीत तब्बल 350 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी हीच रक्कम सुमारे 599 कोटींची होती. या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार थंडावल्याने पालिकेच्या मेअखेर पर्यंतच्या महसुलात सुमारे 150 कोटींची तूट आली आहे. आता मुदतवाढ मिळाल्याने हा महसूल पुन्हा जमा होईल, असा पालिकेला विश्वास आहे.
सवलतीपेक्षा 2 टक्के दंडाची भीती
पालिका एका बाजूला करसवलत देते. तर, दुसऱ्या बाजूला 31 मेनंतर बिलावर 2 टक्के दंड आकारला जातो. हा दंड चक्रवाढ व्याज पद्धतीचा असल्याने तो वर्षाअखेरीस एकूण बिलाच्या रकमेच्या 27 टक्के होतो. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे सवलतीपेक्षा दंडाची रक्कम कितीतरी अधिक पटीने असल्याने काही नागरिकांनी 31 मेपूर्वी कर भरण्यास प्राधान्य दिले.



