पुणे | व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेतून अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
राज्य सीईटी सेलने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयाने विविध कारणांमळे प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
संस्थास्तरावरील प्रवेश फेरी असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जागरूक राहून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासून नोंदणी करता येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर राहणार आहे, तर आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेशाची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर राहणार आहे.
एमबीए, एमई आणि एम- आर्च अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी आजपासून नोंदणी करता येईल. एमबीए आणि एमई प्रवेशाची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर, एम-आर्च प्रवेशासाठी अंतिम तारीख २१ ऑक्टोबर आहे.
नियमित प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा; तसेच संस्थास्तरावरील रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ई- स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष पडताळणी पद्धतद्वारे नोंदणी करता येईल.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चिती करणे आवश्यक राहणार आहे. अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.
त्यानंतर या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवरील केली जाईल. प्रवेशासाठी पात्रता नियम आणि माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
विद्यार्थी पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.





