Pune : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी रंगणार चुरस

पुणे : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम व वैद्यकीय अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीसाठी यंदा विद्यार्थ्यांनी सर्वाधिक नोंदणी केली आहे. यावर्षीच्या सीईटीकरिता ८ लाख ९४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे शुल्क भरून नोंदणी अंतिम केली आहे.
नोंदणीची प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू झाली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपली. गतवर्षीच्यातुलनेत नोंदणीची संख्या यंदा १ लाख ६८ हजार ९६१ इतकी वाढली आहे. यावरुन व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
या दिवशी होणार परीक्षा
वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमांना प्रवेशसाठी पीसीबी ग्रुप, तर अभियांत्रिकी प्रवेशासाठी पीसीएम ग्रुपची सीईटी द्यावे लागेल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अर्थात पीसीबी ग्रुपची परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम ग्रुपची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान होणार आहे.
शैक्षणिक वर्ष नोंदणीची संख्या
२०२२ – २३ – ६ लाख ६ हजार ७९०.
२०२३-२४ – ६ लाख ३६ हजार ८०४.
२०२४-२५ – ७ लाख २५ हजार ७७३.
२०२५ -२६ – ८ लाख ९४ हजार ७३४.





