Pune : जातवैधतेसाठी तीन महिने मुदतवाढ

पुणे : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. एसईबीसी आणि ओबीसी या प्रवर्गातून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत; परंतु वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत, अशा उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आजच्या तारखेपासून तीन महिने कालावधी वाढवून देण्यात आला आहे. ही मुदतवाढ एसईबीसी आणि ओबीसी या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
दरम्यान, प्रवेशाच्या काळातच विद्यार्थी हिताचा विचार करून राज्य शासनाने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर काही विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालक-विद्यार्थी वर्गातून होत होती.
त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने आता तीन महिन्यांची मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या अधिकच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यास त्यास संबंधित पालकच जबाबदार राहतील, असेही राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




