आसवनी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला नियमांचे पालन केल्यासच परवानगी द्यावी – बाळासाहेब मुरकुटे

नेवासा (प्रतिनिधी) – भेंडे बुद्रुक येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित आसवनी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शंभर टक्के नियमांचे पालन केल्यासच परवानगी द्यावी, असे भाजपचे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी त्रिसदस्यीय समितीला सुनावणीवेळी सांगितले.
हा प्रकल्प सध्या 45 के.एल.पी.डी.प्रमाणे चालू आहे. 100 के.एल.पी.डी प्रकल्पास मंजुरी देतेवेळी शंभर टक्के प्रदूषण नियमांचे सन 2006च्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या अटींवर सर्व प्रकल्पातील शुद्धीकरण यंत्रणातून कार्यक्षम प्रणालीचा अवलंब करून, आसवनी प्रकल्पास मंजुरी द्यावी. सध्या मात्र हा कारखाना कुठल्याही नियमांचे पालन करत नाही. शासकीय, सहकार व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संलग्नतेने व आशीर्वादाने खोटे अहवाल व रिपोर्ट तयार करून सध्या आसवनी प्रकल्प चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे आणखीच प्रदूषणाचा धोका वाढला जाणार आहे. या प्रकल्पामुळे दुध-दुभते जनावरे, भाजीपाला व मानवावर प्रदूषण नियमांचे पालन न केल्यामुळे गंभीर परिणाम होणार आहेत. सद्यःस्थितीत चालू असलेल्या आसवनी प्रकल्पामधून बाहेर पडणाऱ्या स्पेंड वॉश (मळीचे पाणी)चे कुठल्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले दिसून येत नाही. प्रदूषण विभाग आणि प्रकल्प प्रवर्तकांच्या संगनमताने गट क्रमांक 234मध्ये कच्च्या मातीच्या तलावात बेकायदा साठवणूक करण्यात येत असल्यामुळे स्पेंड वॉशमधील घटक द्रव्य जमिनीच्या भूगर्भात मुरलेले आहे. परिणामी हे घटक द्रव्यांचे क्षार विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यात उतरल्यामुळे पाणीही दूषित झाले आहे, असे माजी आ. मुरकुटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हे पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडले जाते. याचा दुष्परिणाम नगर आणि मराठवाडा या दोन्ही विभागाच्या पिण्याच्या पाण्यावरही होत आहे. प्रकल्पातून स्वतंत्र शेतकऱ्यांना उसाचा भाव, स्वतंत्र साखर कारखान्याचा भाव व स्वतंत्र सहवीजनिर्मितीचा भाव असे तीन वेगवेगळे भाव करूनच त्या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, अशी मागणी करुन शेतकऱ्यांचे 109 रुपये प्रतिटन कपात करताना ज्यांची सहमती आहे, त्यांचे पैसे कपात करावे आणि ज्यांची सहमती नाही, त्यांना त्यांचे पैसे परत देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी या वेळी त्यांनी केली आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/shock-the-rulers-by-shutting-down-koynes-electricity-udayanaraje/
या आसवनी प्रकल्पात नियम व अटींचे पालन झाले तरच प्रकल्पास मंजुरी द्यावी, असे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी आ. मुरकुटे यांनी दिले आहे.





