नेवाशात महायुतीकडून ना’राज’ मुरकुटेंची मनधरणी होणार की तिरंगी सामना रंगणार?

नेवासा (राजेंद्र वाघमारे) – एकाला पक्षाचे तिकीट मिळाले तर दुसऱ्याला शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाने नादी लावून झुलवित ठेवले. दोन पावरफुल आणि वजनदार नेतेमंडळीत त्यामुळे आता तरी समझोता होणार का? नेमके कोणाला थांबायला लावणार? कोण माघार घेणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर ज्याला पक्षाचे तिकीट मिळाले ते तर थांबूच शकत नाही, पण ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्यांची आता पक्षीय पातळीवर मनधरणी करण्याची गरज असल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतून व्यक्त केल्या जात आहेत. (nevasa assembly election 2024)
एकीकडे थांबायला लावणाऱ्या या नेत्याला पक्ष आश्वासन देणार का? आणि त्या पक्षाच्या आश्वासनावर आता हा नेता खरंच थांबणार का? शेवटपर्यंत पक्षाने कामाला लागा, असा कानमंत्र या नेत्याला दिला आणि शेवटच्या क्षणी घुमजाव केले, त्या पक्षावर आता या नेत्याचा खरंच विश्वास बसणार का? आणि त्यामुळे दिलजमाईचा हा ‘समझोता’ एक्सप्रेस केवळ फार्सच ठरणार असून या नेत्याला आता आश्वासनापेक्षा प्रत्यक्षात कृती केली तरच काही बदल होवू शकतात. अन्यथा नेवाशाच्या राजकीय रणांगणात तिरंगी सामना रंगणार असल्याची भविष्यवाणी अटळ असल्याच्या चर्चा राजकीय आखाड्यात सुरु झालेल्या आहेत.
तिकीट मिळण्याच्या दोन दिवस आधी या नेत्याला पक्षाने कामाला लागा असा सल्ला दिला? तर ऐनवेळी आपल्या पक्षाची जागा मित्र पक्षाला देवून आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाला दुसऱ्या पक्षाने उमेदवारी दिली त्यामुळे आता या पक्षाच्या आश्वासनावर हा बंडखोर ना’राज’ नेता आता तरी कसा विश्वास ठेवणार? आणि या नेत्याचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द जरी दिला गेला तरी परत पक्ष केवळ आश्वासन देणार? जर दोन दिवस आधी या नेत्याला पक्षाने कामाला लागण्याचा सल्ला दिला असतांना या पक्षाने चक्क या नेत्याला उमेदवारी न देता मित्र पक्षाला जागा देवून उमेदवारी दिली त्यामुळे आता हा बंडखोर नेता आश्वासनपूर्तीवर विश्वास तरी कसा ठेवणार? त्यामुळे आता या नेत्याला आश्वासन नको तर कृतीच हवी, असा प्रयोग राबविला गेला तरच कदाचित समझोता एक्सप्रेस घडू शकतो. अन्यथा नेवाशाच्या राजकीय आखाड्यात तिरंगी सामना अटळ असल्याचा राजकीय रागरंग सुस्पष्टपणे दिसून येण्याची चिन्हे दिसून येवू लागली आहेत.
शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दोन नेते तालुक्यात राजकीयदृष्या वजनदार म्हणून ओळखले जातात, या दोन नेत्यांमागेच खऱ्या अर्थाने जनमत आहे. त्यामुळे या दोन नेत्यांनी मैत्रीत कुस्ती केल्यास या मत विभागणीचा फटका बसून महाविकास आघाडीला याचा मोठा फायदा होवू शकतो. त्यामुळे महायुतीकडून समझोता एक्सप्रेस राबविण्याच्या वरिष्ठपातळींवरुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता या ना’राज’ बंडखोर नेत्याला आश्वासनावर लवकर विश्वास बसणार नसल्यामुळे प्रत्यक्षात कृतीची गरज आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्षपद आता लंघे यांना सेनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे रिक्त झालेले आहे तसेच इतर आश्वासने देवून दुभंगलेली नाळ पुन्हा एकत्र जोडण्यात महायुती यशस्वी होणार? की, नेवाशात तिरंगी सामना रंगणार? याबाबत जनतेच्या मनात चांगलीच चलबिचल सुरु झालेली आहे. नेवासा विधानसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान आ. शंकरराव गडाख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत.





