पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

बीड : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे या विजयी झाल्या. त्यांच्या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. याच उत्साहाच्या भरात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पंकजाताई भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.
मंत्रीपदी लागणार वर्णी?
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी व्होट बँक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा वादामुळे ओबीसी व्होट बँक घसरल्याने भाजपला मोठा फटका बसला होता.
पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव
भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे 2019 मध्ये राज्य विधानसभा निवडणूक हरल्या होत्या. व काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर पंकजा मुंडेच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा रंगली. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ओबीसी व्होट बँक मजबूत करण्याच्या हिशोबाने पंकजा यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनदेखील आणले.





