Excise Department Raid : उत्पादन शुल्क विभाग जागे झाले! ६४५ लिटर विषारी दारू जप्त; मुख्य सूत्रधारांसह अनेकांना बेड्या
Excise Department Raid : २६ ते २८ मे दरम्यान फुगेवाडी आणि हडपसरमध्ये झालेल्या मृत्यूंनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची २९ मेच्या मध्यरात्री मोठी मोहीम.

Excise Department Raid – दापोडी ते हडपसरमद्ये मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूने झालेल्या मृत्यूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधारांसह अनेकांना ताब्यात घेतले असून ६४५ लिटर विषारी गावठी दारू जप्त केली आहे. २६ ते २८ मे दरम्यान संजयनगर, फुगेवाडी आणि दापोडीत काहीजमांना विषबाधेसदृश लक्षणांमुळे रुग्णालयांत दाखल केले होते.
यातील पाचजणांचा मृत्यू झाल्यावर उत्पादन शुल्क विभागाने तपास केला. तपासात कर्नल सिंग विरका (लष्कराशी काहीही संबंध नाही) आणि गुरुमंगतसिंग विरकाला अटक केली आहे. हडपसरच्या पांढरेमळा परिसरातही अशाच प्रकारे चारजणांचा मृत्यू झाला. दोन्ही घटना परस्पर संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
योगेश व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड याने संबंधित आरोपींना मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूचा पुरवठा केल्याचे समोर आले. त्याला उत्पादन शुल्कने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच दारूचा पुरवठा करणारा राधेश्याम उर्फ राजू प्रजापती यालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
योगेश व्हानकडेच्या चौकशीनंतर उत्पादन शुल्कने २९ मे च्या मध्यरात्री हडपसर येथील आकाश जाधवकडून ७० लिटर, दापोडीतील इरफान कुरेशीकडून १५५ लिटर आणि गोखलेनगरमधील आर्यन धोत्रेकडून ४२० लिटर अशी एकूण ६४५ लिटर गावठी दारू जप्त केली. उत्पादन शुल्कच्या माहितीनुसार योगेश व्हानकडेविरोधात तीन, आकाश जाधवविरोधात चार, कर्नल सिंग विरकाविरोधात एक आणि राधेश्याम प्रजापतीविरोधात चार गुन्हे नोंद आहेत.
वर्षात २९ कोटी ७४ लाखाचा मद्यसाठा जप्त
उत्पादन शुल्क विभागाने २०२५-२६ मध्ये अवैध मद्यनिर्मितीविरोधात ६,४६२ गुन्हे नोंदवून २९ कोटी ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पाचजणांविरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी व्यापक तपास आणि विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू असून हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांनी दिली.






