Salil Ankola Depression : धक्कादायक! टीम इंडियाचा माजी खेळाडू नैराश्याच्या विळख्यात; पुण्याच्या रिहॅब सेंटरमध्ये झाला दाखल
Salil Ankola Depression : सलील अंकोलाने १९८९ मध्ये कराची येथे सचिन तेंडुलकरसोबत कसोटी पदार्पण केले होते.

Ex Cricketer Salil Ankola Battles Depression : भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि माजी राष्ट्रीय निवडकर्ता सलील अंकोला सध्या तीव्र नैराश्याचा (Depression) सामना करत आहे. या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ५८ वर्षीय सलीलने पुण्याजवळील एका पुनर्वसन केंद्रात (Rehabilitation Centre) स्वतःला दाखल करून घेतले आहे.
आईच्या विरहाने खचला खमक्या खेळाडू – (Salil Ankola Depression)
सलील अंकोलाच्या या निर्णयामागचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या आईचे निधन. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याच्या आईचे देहावसान झाले, मात्र दीड वर्ष उलटूनही सलील या दुःखातून बाहेर पडू शकलेला नाही. सलीलची पत्नी रिया अंकोला हिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, आईच्या निधनाने सलील मानसिकरित्या प्रचंड व्यथित होता. शारीरिक व्याधी आणि ढासळत्या मानसिक आरोग्यामुळे त्याने शांत वातावरणात उपचार घेण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.
Wishing Salil Ankola a speedy recovery 🙏 ❤️ pic.twitter.com/4BS2tnSnnW
— Gaurav Gupta (@toi_gauravG) May 7, 2026
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतणार –
दोन दशकांपूर्वी सलीलने मद्यपानाच्या व्यसनावर मात करण्यासाठी पुनर्वसन केंद्राची मदत घेतली होती. मात्र, यावेळी तो केवळ मानसिक स्वास्थ्यासाठी तिथे गेला असून लवकरच आपल्या ‘पहिल्या प्रेमा’कडे म्हणजेच क्रिकेटकडे परतेल, असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. “सलील नेहमीच झुंजार वृत्तीचा राहिला आहे, तो या संकटातून अधिक कणखर होऊन बाहेर येईल,” असे रिया म्हणाली. (Salil Ankola Depression)
निवडकर्ता ते अभिनेता: अष्टपैलू कारकीर्द –
सलील अंकोलाने १९८९ मध्ये कराची येथे सचिन तेंडुलकरसोबत कसोटी पदार्पण केले होते. दुखापतीमुळे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी क्रिकेट सोडावे लागल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तो पुन्हा क्रिकेट प्रशासनाकडे वळला. मुंबईचा मुख्य निवडकर्ता आणि त्यानंतर राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून त्याने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या तो समालोचक म्हणून कार्यरत आहे. (Salil Ankola Depression)





