India Win Series : लखनौमध्ये टीम इंडियाचा महाविजय, अफगाणिस्तानचा १७० धावांनी उडवला धुव्वा! गिल-इशानची शतकी खेळी
India Win Series : या दणदणीत विजयासह भारताने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.

IND vs AFG 2nd ODI India Beat Afghanistan by 170 Runs : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाने संपला आहे. लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा १७० धावांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. या दणदणीत विजयासह भारताने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने आता मालिका खिशात घातली असून, तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.
गिल-इशानचे वादळ आणि ४०२ धावांचा जागतिक विक्रम!
सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिल (१५४ धावा) आणि इशान किशन (१२५ धावा) यांच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर भारताने ४९.२ षटकांत सर्वबाद ४०२ धावांचा डोंगर उभा केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पूर्ण संघ बाद (All Out) होऊनही ४०० हून अधिक धावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ ठरली.
दडपणाखाली अफगाणिस्तानचा डाव गडगडला –
You miss, I hit! 🔥
An absolute peach of a yorker from Gurnoor Brar to get his third wicket 🤌
Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QtaH9BEBop
— BCCI (@BCCI) June 17, 2026
प्रत्युत्तरात ४०३ धावांच्या विशाल आणि अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाण फलंदाज धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसले. मध्यक्रमातील फलंदाजांनी काही वेळ खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, परंतु वाढत्या रनरेटच्या दडपणाखाली अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या २३२ धावांवर गारद झाला. भारताने गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. भारतासाठी गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने एक आणि प्रिंस यादवने दोन विकेट्स घेतल्या.
कर्णधार म्हणून शुबमन गिलचा पहिला मालिका विजय –
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा पहिलाच वनडे मालिका विजय आहे. रोहित शर्मानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी गिलला भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, ज्यावरून क्रिकेट वर्तुळात बराच गदारोळ माजला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला होता, मात्र गिलने शानदार पुनरागमन करत कर्णधार म्हणून आपली पहिली मालिका जिंकली आहे. या सामन्यात फलंदाजीतही त्याने १५४ धावांची सर्वोत्तम खेळी करत टीकाकारांना चोख उत्तर दिले.





