पुणे | ईव्हीएम सुरक्षा महत्त्वाची, यंत्रणा सज्ज ठेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ईव्हीएम सुरक्षा महत्त्वाची असून त्यामध्ये ईव्हीएम कक्ष, कक्षाची डागडुजी, कक्षातील वीजयंत्रणा, सीसीटीव्ही, वेबकास्टिंग, तसेच वाहन जीपीएस ट्रॅकिंग, परिसरातील वाहनतळ, ईव्हीएम ने-आण करताना येणारे अडथळे आदी बाबींचा विचार करुन कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, मनपा उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे तसेच मार्गदर्शक सूचनांचे सर्व अधिकाऱ्यांनी अवलोकन करावे. नियम सर्वांना समजेल, असे भाषांतरित करावीत. या नियमांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय व संवाद साधून कामे करावीत; त्यानुसार सूक्ष्म नियोजन करुन उत्कृष्ट आराखडा तयार करावा,
कालावधीचा विचार करता निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण होईल, याबाबत दक्षता घ्यावी. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे प्रशिक्षण आयोजित करावे. यामध्ये आचारसंहितेचे पालन, कोणत्या बाबींचे उल्लंघन होऊ नये, हिंसक कृत्य टाळण्यासाठी काय करावे, विविध परवानग्या, सुरक्षितता तसेच व्हिडिओ कॅमेरा, सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आदी बाबींचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या.
मतदानाची टक्केवारी वाढावी
पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी कमी राहता कामा नये. विशेषतः युवक आणि महिलांची टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबवावेत. यासाठी त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासह समाज माध्यमांद्वारे जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या.





