“सर्वांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकलेत”; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Chandrashekhar Bawankule : आगामी स्थानिक निवडणुकीचे वेध सर्वांना लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीने निवडणुकीच्या अंनुषंगाने कंबर कसली असून, मुंबईत स्वबळ तर इतरत्र शक्य तिथे युती अन् मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खरंतर गेल्या चार ते पाच वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नव्हत्या. आता या निवडणुका होत असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकांवर केंद्रित झाले आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम केले जात आहे. अशाच एका कार्यक्रमात भाजपच्या बड्या नेत्याने खळबळजनक वक्तव्य केले आहे. सर्वांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकले असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे.
बावनकुळे यांनी नुकताच भंडारा जिल्ह्याच्या दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका कशा जिंकायच्या यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बंडखोरी केली जात आहे. यावर बोलताना भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल, असे बावनकुळे म्हणाले. पुढे ते म्हणाले, जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील, असा थेट इशारा त्यांनी दिला.
मात्र, देवेंद्र फडणवीस आणि…
नेत्यांनी विचार करावा. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण खडा तमाशा करतो. एक चुकीची बटन, एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या योजनांचा यामुळे बट्ट्याबोळ होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले.





