Radhakrishna Vikhepatil : “दुष्काळमुक्तीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक” – राधाकृष्ण विखेपाटील

Radhakrishna Vikhepatil – जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुट उचलून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. येत्या काळात समुद्रात वाहून जाणारे ६५ अब्ज घनफूट पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे विखेपाटील म्हणाले.
गोदावरीतील पाण्याची तूट भरून काढतानाच १२ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प, तरंगत्या सौर पटलाच्या आधारे ऊर्जा निर्मितीचे प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे. याबरोबरीने जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी १५० कोटी रुपये दिले असून, एक वर्षात ही योजना पूर्ण होणार आहे. तसेच जायकवाडी धरणातील गाळ काढून क्षमता वाढविण्यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे विखेपाटील बोलताना म्हणाले.
सध्या जायकवाडी धरणामध्ये ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी १ हजार ५२०.१८ फूट एवढी असून, त्यात ९५.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) जलसाठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या १८ दरवाजे अर्धा फूट उघडून ९४३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सद्यस्थितीत धरणात १६ हजार २३० प्रति संकेद लिटर एवढी पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.





