‘The Bengal Files’ Movie Trailer : प्रत्येक सीन अंगावर काटा आणणारा; बहुचर्चित ‘द बंगाल फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

‘The Bengal Files’ Movie Trailer : ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या मालिकेतील त्यांचा पुढचा सिनेमा ‘द बंगाल फाइल्स‘ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा १९४६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित आहे.
या सिनेमाचा ट्रेलर ३ मिनिट ३२ सेंकदाचा असून, यातील दृश्य अंगावर येणारी आहेत. या सिनेमातही दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाइल्स’चा फॉर्म्युला वापरल्याचं दिसत आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला रक्तपात आणि दंगलीचे भयानक दृश्ये एकामागून एक दिसतात. या सिनेमातही दोन कालखंडांच्या कथा समांतर पद्धतीने सुरू असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
एकीकडे स्वातंत्र्यापूर्वी १९४६ मध्ये झालेल्या दंगलींची कहाणी दाखवली जात आहे. तर दुसरीकडे, वर्तमान काळात त्या घटनांबाबत होत असलेला तपास आणि चौकशी हे दाखवलं जात आहे. मात्र, ट्रेलवरून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी आणि जिना यांची पात्रंही दिसत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री पल्लवी जोशी या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
‘द बंगाल फाइल्स’ मध्ये कोलकाता दंगलीतील विदारक घटनांचे चित्रण दाखविण्यात आलं आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. सिनेमाच्या घोषणेपासून सिनेमाच्या निर्मात्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. हा सिनेमा ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा : भाजपला धक्का; माजी मंत्र्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश





