Ajit Pawar : निवृत्त होणार असलात तरी बदली करेन; अजित पवारांचा महापालिका आयुक्तांना इशारा

पुणे : बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून १६५ कोटी निधी आला असून, यामधून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबतची सद्यस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आयुक्तांना विचारली. त्यावर पालिका आयुक्तांनी या जागेवरील राडारोडा काढून जागा मोकळी झाली नसल्याचे सांगितले. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, की निधी दिला, सूचना दिल्या, तरी कामे होत नाहीत. तुम्ही ३१ मे रोजी निवृत्त होणार आहे ना. तरी देखील तुमची बदली करेन. मी येथून मुंबईला जाण्याअगोदर तुमच्या बदलीची ऑर्डर आलेली असेल, अशा शब्दांत पवार यांनी पालिका आयुक्तांना बदलीचा इशारा दिला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळील शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या प्लॉटवर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा ठेवून जागा बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारी गळती दुरुस्त करता येत नाही. यापूर्वीही पालकमंत्र्यांनी सूचना देऊनही कार्यवाही झाली नसल्याचा मुद्दा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला. गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, तुम्ही सूचना देऊनही प्रशासन कारवाई करीत नसल्याचे मिसाळ यांनी या वेळी सांगितले.
तेव्हा संतापलेल्या पवार यांनी प्रशासनाला या विषयांबरोबरच बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून दिलेले १६५ कोटी रुपये आणि भिडे वाडा स्मारकासाठी महापालिकेच्या उपलब्ध करून दिलेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीवरून धारेवर धरले. तिक्रमणाच्या मुद्यावरून बोलताना पवार म्हणाले, वेळीच लक्ष घातले पाहिजे. पुढे जाऊन तो भावनिक मुद्दा होतो. त्याचे पडसाद मग राज्यभर उमटतात, असे पवार म्हणाले.
तीन दिवसांचा अल्टिमेटम…
मुख्यमंत्री, मी आणि एकनाथ शिंदे यांनी सांगूनसुद्धा महापालिकेकडून बाणेर येथील जागेवरील राडारोडा उचलला नाही. त्यामुळे फुकट निधी मिळत असूनही प्रकल्प मार्गी लागत नाही. मग त्याचा फायदा काय? त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तीन दिवसांत त्या जागेवरील राडारोडा उचला. तीन दिवसानंतर सकाळीच सात वाजता येऊन मी प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहे, असा इशाराही पवार यांनी दिला.





