CM शिंदे अपात्र ठरले तरी तेच मुख्यमंत्री राहतील ! प्लॅन B सांगत फडणवीस म्हणाले,”अपात्र ठरले तरी त्यांना..”

मुंबई- “मी पुन्हा येईन’च्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या व्हिडिओमुळे (Mi punha yein Video) राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शनिवारी एका मुलाखतीत पूर्णविराम दिला. या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहतील, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. त्यात बदल होणार नाही. शिंदे व त्यांचे आमदार अपात्रही ठरणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहेच. पण जरी ते अपात्र ठरले तरी त्यांना विधान परिषदेवर जाण्याचा पर्याय आहे. मात्र मुख्यमंत्रिपदी शिंदेच राहतील,’ असा दावा फडणवीस यांनी केला.
बहुचर्चित व्हिडिओबाबत बोलताना फडणवीस यांनी “जो पुन्हा मुख्यमंत्रिपदी येणार असतो तो असे व्हिडिओ टाकून थोडेच येत असतो,’ असा प्रतिप्रश्न केला. अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री करण्याचा आम्ही कधीही शब्द दिला नव्हता. उपमुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता, तो आम्ही पूर्ण केला, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
यासह, “मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार सकारात्मक आहे. मी मनोज जरांगे-पाटील यांना काहीही सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. काही ठिकाणी शिंदे समितीला विरोध झाला, जर समितीने कामच केले नाही तर पुरावे कसे जमा करता येणार? जरांगेंनी सरकारशी समोर येऊन चर्चा केली तर आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग निघू शकेल,’ असेही फडणवीस म्हणाले.





