केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध समित्यांची स्थापना; भाजपच्या मित्रपक्षांनाही स्थान

नवी दिल्ली – केंद्रातील एनडीए सरकारने बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध समित्यांची स्थापना केली. त्यामध्ये तेलगू देसम पक्ष (टीडीपी), जेडीयू, शिवसेनेचा शिंदे गट आदी भाजपच्या मित्रपक्षांनाही स्थान मिळाले आहे.
मंत्रिमंडळ समित्यांमध्ये (कॅबिनेट कमिटी) पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असतो. सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय व्यवहारविषयक समित्यांना देशाशी संबंधित महत्वाच्या निर्णयांमध्ये सर्वोच्च स्थान असते.
सुरक्षाविषयक समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. अर्थविषयक समितीत मोदी, राजनाथ, शहा, सीतारामन, जयशंकर यांच्यासह इतर मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे.
त्यामध्ये नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान आणि जेडीएसचे एच.डी.कुमारस्वामी यांचा समावेश आहे. पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि जेडीयूचे लल्लन सिंह यांनाही अर्थविषयक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे.
राजकीय व्यवहारविषयक समितीचे प्रतिनिधित्व मोदी, राजनाथ, शहा, गडकरी, सीतारामन, गोयल, जे.पी.नड्डा करतील. त्या समितीमध्ये किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी) आणि जितनराम मांझी (हम) यांनाही स्थान देण्यात आले आहे.
संसदीय कामकाजविषयक समितीमध्ये राजनाथ, शहा, नड्डा, सीतारामन, किरेन रिजीजू यांचा समावेश आहे. नियुक्तीविषयक समितीमध्ये आधीप्रमाणेच मोदी आणि शहा हे केवळ २ सदस्य आहेत.
गुंतवणूक आणि विकासविषयक समितीमध्ये मोदी, राजनाथ, शहा, गडकरी, सीतारामन, गोयल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे. त्या समितीमध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विशेष निमंत्रित असतील. कौशल्य, रोजगारविषयक आणि इतर समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.





