पृथ्वी वाचवण्यासाठी पर्यावरण संरक्षण काळाची गरज – शोभाताई आर धारीवाल

पुणे: रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उवसग्गहरं स्तोत्र’ सामूहिक जपाचा भव्य कार्यक्रम यंदा रविवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बिबवेवाडी येथील श्रीमान रसिकलालजी एम. धारीवाल स्थानकात संपन्न झाला. या कार्यक्रमात जैन धर्मातील मान्यवर संत, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, विद्यार्थी आणि जैन-अजैन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवव्या वर्षी आयोजित कार्यक्रमात सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
सकारात्मक ऊर्जेसाठी उवसग्गहरं स्तोत्र जप –
रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई आर. धारीवाल यांनी सांगितले की, जैन धर्मातील मूल्ये आणि संस्कारांची परंपरा हजारो वर्षांपासून अखंडित आहे. त्यांनी उवसग्गहरं मंत्राचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हा मंत्र संकटांवर मात करणारा आहे. “श्रीमान रसिकलाल धारीवाल यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना वैद्यकीय सेवेसोबतच या मंत्राच्या रोजच्या जपाने सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांचे प्राण वाचले,” अशी आपली धारणा त्यांनी व्यक्त केली. याच विश्वासातून फाऊंडेशनद्वारे दरवर्षी सामूहिक स्तोत्र जपाचे आयोजन केले जाते, ज्यामुळे समाजात सकारात्मक भावना निर्माण होतात. यंदाही या कार्यक्रमात जैन समाजासह अजैन बंधूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कार्य
शोभाताई यांनी पर्यावरण संरक्षणावर विशेष भर देत म्हणाल्या, “पृथ्वीला वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आहे.” रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनद्वारे आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भारतभर कार्य केले जाते. गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी मदत, तसेच अत्यवस्थ शाकाहारी रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या नेतृत्वाखाली ५० ते १०० वर्षे वयाची मोठी झाडे वाचवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत २,१०० हून अधिक झाडांचे पुनर्रोपण करून त्यांना वाचवण्यात यश मिळाले आहे. शोभाताई यांनी यावेळी सांगितले की, बांधकाम किंवा रस्ते विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी वृक्षारोपण हा पर्याय नसून, वृक्ष पुनर्रोपण हा अधिक प्रभावी उपाय आहे. त्यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
डीजे मुक्त दहीहंडी उत्सवाचे कौतुक-
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे डीजे मुक्त आयोजन करणाऱ्या बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे शोभाताई यांनी विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “जान्हवी धारीवाल बालन आणि पुनीत बालन यांनी पर्यावरण आणि पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.” त्यांनी या कार्यासाठी दोघांचे अभिनंदन केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन –
कार्यक्रमाला पद्मश्री आचार्य चंदनाजी, पू. श्री मुकेश मुनिजी, पू. श्री जयप्रभ विजयजी आणि पू. श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी उपस्थिती लावली. आचार्य चंदनाजी यांनी जान्हवी धारीवाल यांच्या बिहारमधील विरायतन संस्थेच्या कार्यातील योगदानाची प्रशंसा केली. “जान्हवी यांनी लहान वयातच रुग्णसेवा आणि शिक्षण कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. मी त्यांना आशीर्वाद देते.” पू. श्री जयप्रभ विजयजी यांनी उवसग्गहरं स्तोत्राचे महत्त्व समजावून सांगितले, तर पू. श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत त्याचा लाभ सर्वांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पू. श्री मुकेश मुनिजी यांनी सामूहिक जपाचे सामाजिक लाभ अधोरेखित केले.
सहभागी आणि महाप्रसाद –
कार्यक्रमाला श्री पुनीत बालन, पोपटशेठ ओसवाल, श्री वालचंदजी संचेती, श्री विजयकांतजी कोठारी, अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, शोभाताई आर. धारीवाल वसतिगृह (एफसी रोड, डेक्कन आणि चिंचवड) येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध गणेश मंडळे, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक आणि जैन-अजैन बंधू-भगिनी उपस्थित होते. स्तोत्र पठणानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





