IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा आदर्श! आईच्या अस्थींचे नदीत नव्हे, तर शेतात विसर्जन करून लावले वडाचे झाड
IAS Tukaram Mundhe : माजी सचिव तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या निधनानंतर पारंपरिक प्रथा बाजूला ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने अस्थी विसर्जन केले.

IAS Tukaram Mundhe : दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या निधनानंतर घेतलेल्या निर्णयामुळे एक वेगळा आणि आदर्श संदेश समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.
ताडसोना (जि. बीड) येथील मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचे निधन झाले तेव्हा मुंढे पश्चिम बंगाल येथे सेवेत होते. तेथून ते तातडीने पुण्यात येऊन पुढे आपल्या गावी दाखल झाले.
आईच्या निधनानंतर भावनिक झालेल्या मुंढेंचा मानवी पैलू यावेळी दिसून आला. बंधूंच्या गळ्यात पडून रडतानाचा त्यांचा क्षण अनेकांना भावुक करून गेला. मात्र, त्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
पारदर्शक आणि शिस्तप्रिय प्रशासनासाठी ओळख असलेल्या मुंढेंनी वैयक्तिक आयुष्यातही साधेपणा आणि सामाजिक भान जपणारा आदर्श घालून दिला. पारंपरिक प्रथा-परंपरांना बाजूला ठेवत त्यांनी अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी आईच्या अस्थींचे विसर्जन केले.
विशेष म्हणजे, नदीत विसर्जन करण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या शेतातच हा विधी केला. घरासमोर खड्डा खोदून त्यात अस्थी विसर्जित केल्या आणि त्यावर वडाचे रोपटे लावून आईच्या स्मृती जपल्या. यावेळी त्यांनी स्वतः खड्डा खणून, माती टाकून रोपट्याची लागवड केली.
अस्थी विसर्जनानंतर होणाऱ्या पारंपरिक कर्मकांडांना फाटा देत पर्यावरणपूरक पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत असून समाजमाध्यमांवर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.





