Shobhatai Dhariwal : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शोभाताई रिसकलाल धारीवाल यांना प्रतिष्ठित ‘जैन कोहिनूर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. हा सन्मान शतवर्षीय आचार्य श्री १०८ विद्यानंद जी मुनिराज यांचे शिष्य राष्ट्रसंत परमप्राचार्य श्री १०८ प्रज्ञासागर जी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महिला महासभा या संस्थेमार्फत करण्यात आले होते. संस्थेचा ऐतिहासिक वारसा श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महिला महासभा ही जैन समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षण, सामाजिक जागृती आणि सेवाभावी उपक्रमांसाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा या १९५४ साली स्थापन झालेल्या ऐतिहासिक संघटनेचा एक भाग आहे. धारीवाल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विजया रहाटकर यांनी शोभाताई धारीवाल यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आर. एम. धारीवाल फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. शोभाताईंचे मनोगत पुरस्कार स्वीकारताना शोभाताई धारीवाल यांनी महिला दिनाच्या महत्त्वावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “आज आपण महिला दिन साजरा करत आहोत, तो अनेक समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण केल्याशिवाय महिला दिन साजरा करणे अपूर्ण आहे.” तसेच त्यांनी आजच्या महिलांनी पुढील पिढ्यांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडावी आणि मुलांना चांगले संस्कार देणे ही काळाची गरज असल्याचेही सांगितले. समारंभात भक्तिमय सादरीकरण, पारंपरिक संगीत आणि जैन तत्त्वज्ञानावर आधारित सादरीकरणांचाही समावेश होता.