Salman Khan brother abused : ‘लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं…’; सलमान खानच्या भावाचा धक्कादायक खुलासा, डोळ्यांत आले अश्रू!
हा खुलासा केवळ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना समोर आणणारा नाही, तर बालपणीच्या लैंगिक शोषणाबाबत मुलांनी आणि कुटुंबीयांनी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरजही अधोरेखित करणारा आहे.

Salman Khan brother abused : बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता आणि निर्माता सोहेल खान याने यावेळी पडद्यावर नव्हे, तर आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी आठवणींना सामोरं जात एक धक्कादायक खुलासा केला आहे. बालपणी आपल्यावर लैंगिक छळ झाला होता आणि या घटनेनंतर अनेक वर्षे आपण ते दुःख मनातच दडवून ठेवलं, अशी कबुली सोहेलने दिली आहे.
‘Alliance’ या रिअॅलिटी शोमध्ये बोलताना त्याने सांगितलं की, या घटनेबद्दल कोणाला सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. लाज, भीती आणि अपराधीपणाची भावना नसतानाही स्वतःलाच दोष देत तो वर्षानुवर्षे शांत राहिला. मात्र, मोठा झाल्यानंतर त्याने अखेर आपल्या वडिलांशी, ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्याशी या घटनेबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
“माझी काहीच चूक नव्हती, पण मला हे सांगायला लाज वाटत होती,” या सोहेलच्या कबुलीने शोमधील वातावरण भावूक झालं. त्याचा हा खुलासा केवळ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना समोर आणणारा नाही, तर बालपणीच्या लैंगिक शोषणाबाबत मुलांनी आणि कुटुंबीयांनी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरजही अधोरेखित करणारा आहे.
सोहेलचा हा खुलासा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा ‘Alliance’ शोमध्ये त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील सहभागी झाली आहे. दोघांची पुन्हा एकत्र स्क्रीनवर झालेली एन्ट्रीही चर्चेचा विषय ठरली आहे. सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. जवळपास २४ वर्षांच्या सहजीवनानंतर २०२२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघांनी मुलांच्या संगोपनासाठी आपलं नातं सन्मानाने कायम ठेवलं आहे.
घटस्फोटानंतरही सोहेल आणि सीमा यांच्यातील मैत्रीपूर्ण नातं कायम असल्याचं दिसून येतं. मुलांच्या आनंदाला दोघेही सर्वाधिक प्राधान्य देतात. सीमेकडे आजही सोहेलच्या घराची चावी असल्याचा खुलासा त्याने केला आहे. मुलांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सीमा घरात सहज ये-जा करू शकते, असं सोहेलने सांगितलं.







