Ajit Pawar : “तिकडे प्रवेश केला म्हणजे…”; शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांचं जोरदार भाषण

Ajit Pawar | Sharad Pawar – सहकारात काही लोकं चुकीची कामे करतात, मग सत्तेत सहभागी होतात आणि चुकीच्या केलेल्या गोष्टीबाबत स्टे आणतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरूच ठेवायची, म्हणजे हे लोक सुतासारखे सरळ होतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील मंचावर उपस्थित होते. दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्णस्मृती दिन 150 व्या वर्षानिमित्त आयोजित सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विशेष परिसंवादात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. दख्खनची उठाव झालेली शौर्य भूमी माझ्या मतदार संघातील आहे. सूपा परगणा माझ्या बारामती मतदारसंघात हा विभाग येतो. विद्याधर अनास्कर यांचे कौतुक करायला हवे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनास्कर प्रशासक, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील अनास्कर प्रशासक. त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे तेच प्रशासक राहतील, असे मला वाटत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
त्रास देण्याचे काहीच कारण नाही
प्रत्येकाला वाटतं आपण तिकडे प्रवेश केला म्हणजे आपले काम झाले, हे काही बरोबर नाही. मुद्दाम कुणाला नाहक त्रास देऊ नका. पण ज्यांनी चुका केला त्यांना त्रास झालाच पाहिजे. जो चांगले काम करेल, त्याला त्रास देण्याचे काहीच कारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आज सहकारात खूप मोठे बदल झाले आहेत. दुधापासून ते साखरेपर्यंत, पतसंस्था ते नागरी बँकांपर्यंत, बचत गटापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत सहकाराचे योगदान खूप मोठे आहे. आज राज्यामध्ये सव्वा दोन लाख संस्थांचे पाच कोटी 81 लाख सभासद आहेत. ही ताकद पुढे देखील वाढणार आहे.
या संदर्भात स्वतः अमित शाह यांनी असे ठरवले आहे की, आपल्याला काहीही झाले तरी ही संख्या अजून मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे. त्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असून तसे झाल्यानंतर खूप मोठे अमुलाग्र बदल आपल्याला राज्यात पाहायला मिळतील, असे अजित पवार म्हणाले.





