ENG vs PAK 1st Test (Day 4) : मुलतानमध्ये हॅरी ब्रूकचा हाहाकार, पाकविरुद्ध त्रिशतकी खेळीसह रचली विक्रमांची मालिका…

Harry Brook Triple Century : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे त्याने हे त्रिशतक अवघ्या 310 चेंडूत पूर्ण केले. त्याचे त्रिशतक हे कोणत्याही इंग्लिश फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद त्रिशतक आहे.
34 वर्षांतील पहिला इंग्लंडचा क्रिकेटपटू..
यासह ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा गेल्या 34 वर्षांतील पहिला इंग्लंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. ब्रूकच्या आधी, इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा फलंदाज ग्रॅहम गूच होता, ज्याने 1990 मध्ये भारताविरुद्ध 333 धावा केल्या होत्या.
Our first Test triple centurion for 34 years 🏏
Brook joins Sandham, Hammond, Hutton, Edrich and Gooch 📝
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/ZMdsKPmb8q
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024
लाराचा विक्रम मोडित निघण्यापासून थोडक्यात हुकला…
ब्रूकची खेळी पाहून तो ब्रायन लाराची सर्वात मोठी धावसंख्येचा विक्रम मोडेल असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही. ब्रुकला लाराचा विक्रम अवघ्या 84 धावांनी मोडता आला नाही. लाराने 2004 मध्ये अँटिग्वा येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद 400 धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक या सामन्यात 322 चेंडूत 29 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 317 धावां काढून बाद झाला.
सहावा इंग्लिश खेळाडू…
या खेळीच्या जोरावर ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा सहावा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. ब्रूकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक कसोटी (7 बाद 823d) धावसंख्येचा नवा विक्रमही रचला आहे.
ब्रूक झाला मुलतानचा नवा सुलतान…
त्याच्या या खेळीच्या जोरावर ब्रूक आता खऱ्या अर्थाने मुलतानचा नवा सुलतान बनला आहे. कारण त्याने मुलतान स्टेडियमवर सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे. त्याच्या आधी हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता, ज्याने या मैदानावर 364 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. मात्र, सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याच्या बाबतीत सेहवाग अजूनही ब्रूकपेक्षा वरच आहे. त्याने 2007-08 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 278 चेंडूत त्रिशतक झळकावले होते.
ब्रुक आणि पाकिस्तान…
इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने 2022 मध्ये पदार्पण केल्यानंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला होता. 2022 च्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये ब्रुकने 3 शतके ठोकली होती. रावळपिंडीच्या पहिल्या कसोटीमध्ये 153 धावांची, मुलतान कसोटीमध्ये 108 तर कराची कसोटीत 111 धावांची खेळी केली होती. यावेळी देखील ब्रुकने मुलतान येथील पहिल्याच कसोटीमध्ये त्रिशतकी खेळी केली आहे. कसोटीमध्ये ब्रुकच्या नावावर आतापर्यंत 6 शतकांची नोंद असून त्यापैकी 4 शतके त्याने पाकिस्तानविरुद्ध केली आहेत.




