T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरूध्द स्कॉटलंड पराभूत, कांगारूंच्या विजयाचा इंग्लडंला झाला फायदा…

T20 World Cup 2024 (AUS vs SCO) :- टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच इंग्लंडने सुपर-८ मध्ये स्थान पक्के केले. ज्यामुळे स्कॉटलंडचे सुपर-८ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग झाले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने १८१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात १९.४ षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वात मोठी खेळी खेळली. या सामन्यात मार्कस स्टॉइनिसने त्याला चांगली साथ दिली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकात ५ गडी गमावत १८० धावा केल्या. स्कॉटलंड संघासाठी ब्रँडन मॅकमुलेनने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही धडाक्यात झाली नव्हती. त्यामुळे स्कॉटलंड सामना जिंकून मोठा उलटफेर करत विजय खेचून आणेल असे वाटत होते, पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टोनिस जोडीने भक्कम फलंदाजी केली.
Australia finish Group B unbeaten and knock Scotland out of the #T20WorldCup after a tense clash in St Lucia 😮
📝 #AUSvSCO: https://t.co/p84gm73bKM pic.twitter.com/nLw4P5buHA
— ICC (@ICC) June 16, 2024
पहिले काही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टोनिस यांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला नवसंजीवनी दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८० धावांची (४४ चेंडू) भागीदारी केली, ज्यामुळे सामना मोठ्या प्रमाणावर ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळला, जो एकेकाळी त्यांच्या हाताबाहेर गेला होता. ऑस्ट्रेलियाने २ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. ट्रॅव्हिस हेडने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर मार्कस स्टोनिसने त्याला साथ देताना २९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार मारत ५९ धावा केल्या.
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पहिला गडी बाद झाला. तो केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ३२ धावांची (२३ चेंडू) भागीदारी केली. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार मार्शच्या बळीसह ही भागीदारी संपुष्टात आली, तो ९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ ८ धावा करू शकला. यानंतर नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलने ८ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्या.
त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्क स्टोनिस यांनी चौथ्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडच्या बाद होण्याने संपुष्टात आली. हेडने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. त्यानंतर १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्क स्टोनिस पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टॉइनिसने २९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. स्टोनिस बाद झाला तेव्हा सामना बहुतांशी ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात होता.त्यानंतर सहाव्या गड्यासाठी मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिड यांनी ३१ (१६ चेंडू) अशी अखंडीत भागीदारी केली आणि संघाला विजज प्राप्त करुन दिला. टीम डेव्हिडने १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २४ धावा केल्या आणि मॅथ्यू वेडने ५ चेंडूत नाबाद ४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – स्कॉटलंड – २० षटकांत ५ बाद १८० धावा. (ब्रेंडन मॅकमुलेन ६०, रीची बेरिंग्टन नाबाद ४२, जॉर्ज मुनसे ३५, ग्लेन मॅक्सवेल २-४४). ऑस्ट्रेलिया – १९.४ षटकांत ५ बाद १८६ धावा. (ट्रेव्हीस हेड ६८, मार्कस स्टोनिस ५९, टीम डेव्हीड नाबाद २४, मार्क वॅट २-३४, शफियान शरीख २-४२).





