ENG vs WI 3rd Test : जो रूटने रचला इतिहास, ब्रायन लारासह रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम काढला मोडित….

ENG vs WI Joe Root Record : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम रचताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने 7 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या आणि तो बाद झाला. या सामन्यात त्याला कसोटी कारकिर्दीतील 33 वे शतक झळकावता आले नाही, पण कठीण परिस्थितीत त्याने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि संघाला सावरण्याचे काम केले. या खेळीच्या जोरावर जो रूटने इतिहास रचला आहे.
ब्रायन लाराला टाकले मागे…
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट सातव्या स्थानावर पोहोचला आहे. रूटच्या नावे आता 143 सामन्यात 12 हजार 027 धावा जमा झाल्या आहेत. या प्रकरणात रूटने वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराला मागे टाकले आहे. ब्रायन लारा आता आठव्या स्थानावर पोहचला आहे. ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील 131 सामन्यांच्या 232 डावांमध्ये 11 हजार 953 धावा आहेत. रुट त्याला मागे टाकत 12 हजार धावांच्या जवळ पोहोचला आहे. रूटने याआधी वेस्ट इंडिजचा आणखी एक महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकले होते, ज्याने 11,867 धावा केल्या होत्या.
रिकी पाँटिंगचा विक्रम काढला मोडित….
यासह जो रूटनेही कसोटीत 12,000 धावाचा ओलांडला आहे आणि रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढत कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 143 सामन्यांमध्ये 12,000 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये 32 शतक आणि 63 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने रिकी पाँटिंगला मागे टाकले ज्याने 146 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. कसोटीत सर्वात जलद 12,000 धावा करणारा फलंदाज कुमार संगकारा आहे ज्याने केवळ 130 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.
Only the second England player to cross 12,000 runs in Test cricket 🌟#WTC25 | #ENGvWI pic.twitter.com/FS9L6mXUHG
— ICC (@ICC) July 27, 2024
ॲलिस्टर कूकलाही टाकले मागे..
यासह जो रूटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटीत सर्वात जलद 12 हजार धावा करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. रूटने 261 व्या डावात ही कामगिरी केली. तर कुकने 275 डावात 12 हजार धावा केल्या होत्या.
रूटची कसोटी कारकीर्द…
सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर…
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने 200 सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके (51) आणि अर्धशतक (68) करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा क्रमांक लागतो, ज्याने 168 कसोटी सामन्यांमध्ये 13,378 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस 166 सामन्यांत 13,289 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ भारताच्या राहुल द्रविडचा क्रमांक लागतो ज्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा ॲलिस्टर कूक 161 कसोटी सामन्यांमध्ये 12,472 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर – 15,921 (329 डाव)
रिकी पाँटिंग – 13,378 (287 डाव)
जॅक कॅलिस – 13,289 (280 डाव)
राहुल द्रविड – 13,288 (286 डाव)
ॲलिस्टर कुक – 12,472 (291 डाव)
कुमार संगकारा – 12,400 (233 डाव)
जो रूट – 12,027* (261 डाव)
ब्रायन लारा- 11,953 (232 डाव)





