Pune News : पर्यटन क्षेत्रातील नवीन उद्योग-व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहन

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीचे समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने ‘भारतातील पर्यटन क्षमता आणि विकसित भारत’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यात तरुणांना पर्यटन क्षेत्रातील नवीन उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आय.सी.एस.एस.आर.) ही आंतरराष्ट्रीय संस्था व प्रा. बी. सी. वैद्य फाऊंडेशन यांच्या सहयोगाने सेमिनार घेण्यात आला. पुणे विभागाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या सहसंचालक शमा पवार, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ.जगदिश सिंग, प्रा.बी.सी.वैद्य फाऊंडेशनचे डॉ.बी.सी. वैद्य, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्या डॉ. दिपाली पाटील, भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी पाचारणे, सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सचिव जनार्दन थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, सुरेशराय देसाई, डॉ. अर्चना गायकवाड, प्रा. शितल वाघमारे, प्रा. रविंद्र आरेकर आदी उपस्थित होते.
राज्याबाहेरील २२ तसेच राज्यातील ९३ संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांनी ५२ शोध निबंधाचे प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने वाचन केले. १२ संशोधक विद्यार्थ्यांनी पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रा.डॉ. जगदिश सिंग व डॉ. विलास उगले यांना डॉ. बी. सी. वैद्य फाऊंडेशन तर्फे पर्यटन विषयात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ‘भूगोल मित्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





