‘तालचक्र’ने रसिक मंत्रमुग्ध

पुणे – युवा वादकांसोबतच दिग्गज कलाकारांचे बहारदार सादरीकरण, शास्त्रीय संगीतासोबतच सादर झालेले फ्युजन आणि तालदिंडी रुपी प्रयोगाने 11 व्या “तालचक्र’ महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवाची संकल्पना तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांची होती; तर “पुनीत बालन समूह’ हे या वर्षी महोत्सवाचे प्रमुख आयोजक होते.
उद्घाटनाच्या सत्रात युवा तबलावादक सागर पटोकार आणि रोहित ठाकूर यांच्या वादनाने आणि सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते या युवा गायकांच्या “सूर सुरंजन’ या सादरीकरणाने सुरुवात झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तालदिंडी या विशेष कार्यक्रमाने झाली. वारकऱ्यांच्या दिंडीसारखी ही तालवाद्य, गायन आणि नृत्याची दिंडी रसिकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचा आनंद घाटे यांनी व्यक्त केला. दुसऱ्या दिवसाचा समारोप नीलाद्री कुमार यांच्या सुरबहार, सतार आणि झितार वादनाने झाला.
सेनिया बंगश घराण्याच्या सातव्या पिढीचे कलाकार असलेले अमान अली बंगश यांच्या सुमधूर सरोदवादनसोबतच बनारस घराण्याचे पारंपरिक तबलावादन ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मिळाली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी “फ्युजन’ हा कार्यक्रम सादर केला. “कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘ दिल की तपीशा आज है आफताब…’ या गीताने त्यांनी कार्यक्रमाचा आणि महोत्सवाचा समारोप केला. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.





