नवी दिल्ली : आणीबाणी हा भारतीय लोकशाहीमधील एक काळा अध्याय होता. ही लोकशाहीतील एक सर्वात दु:खदायी पर्वाची कहाणी होती. केवळ एका कुटुंबाचे हित देशावर आणीबाणी लादण्यात आली. त्या काळात लोकशाही किंवा लोकांचा आवाज टिकला नाही. लोक तुरुंगात बंद होते, देश भीतीने जगत होता आणि एक कुटुंब सत्ता उपभोगत होते, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त जयशंकर यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तीव्र हल्लाबोल केला. जयशंकर म्हणाले की, आज काही लोक भारतीय राज्यघटनेचे पुस्तक हातात घेऊन फिरतात, परंतु त्यांच्या मनात राज्यघटनेविषयी आदर नाही. संपूर्ण देशात आज लोकशाहीची मागणी करणारे आजपर्यंत आणीबाणीसाठी माफी मागू शकले नाहीत. याला आपण नक्की काय म्हणू शकतो? जयशंकर म्हणाले की, मी परराष्ट्र सेवेत नवीन होतो, तेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला सांगितले होते की, भारत हीच लोकशाहीची जननी आहे. पण आणीबाणीमुळे या प्रतिमेला तडा गेला. त्यावेळी भारतावर खूप टीका झाली आणि परदेशातल्या भारतीय राजदूतांसाठी परिस्थिती खूप कठीण झाली होती. आणीबाणीच्या काळात केवळ दोन वर्षांत राज्यघटनेत पाच वेळा सुधारणा करण्यात आल्या आणि नवीन ४८ अध्यादेश आणण्यात आले. ३८ व्या दुरुस्तीने आणीबाणीला न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार काढून घेतला, तर ४२ व्या दुरुस्तीने मूलभूत अधिकार कमकुवत केले आणि न्यायव्यवस्थेची शक्ती मर्यादित केली. या कोणी लोकशाही म्हणू शकेल का? आज परिस्थिती बदलली… जयशंकर म्हणाले की, आज परिस्थिती बदलली आहे. आज देशाचे हित इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ ठरवण्यात आले आहे. जेव्हा शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोळी, संजय झा, जय पांडा, रविशंकर प्रसाद आणि श्रीकांत शिंदे सारखे नेते परदेशात एकत्र येऊन भारताचा पुरस्कार करतात, दहशतवादाविरुद्ध आवाज उठवतात, तेव्हा जगभर भारताचे कौतुक होते. हीच खरी लोकशाही आणि देशभक्ती आहे.