Electronic Bond In Maharashtra : कागदी बॉण्डची झंझट संपणार; आजपासून राज्यात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात, नेमका फायदा काय होणार?

मुंबई : राज्यात आजपासून ई-बॉण्ड (इलेक्ट्रॉनिक बॉण्ड) प्रणाली सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. हा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक विभागाने घेतला असून या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला स्टॅम्प पेपर न घेता, म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही, ई-बॉण्डवर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता. राज्यातील हा सर्वात मोठा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमचे सरकार आता ई-बॉण्डवर आलेले आहे. त्यामुळे या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.
आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉंड देण्याची गरज राहणार नाही. एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. या ई-बाँडची निर्मिती ICEGATE पोर्टलवर होणार असून, NeSL च्या माध्यमातून ई-स्टॅम्पिंग आणि ई-स्वाक्षरी केली जाईल. कस्टम अधिकारी ऑनलाईन पडताळणी करतील. त्यामुळे फसवणुकीस आळा बसणार असून प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
इलेक्ट्रॉनिक बॉण्ड काय आहे?
मुद्रांक विभागाने आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरूवात केली आहे. या निर्णयाचा फायदा हा आयातदार व निर्यातदारांना व्यवहार करण्यासाठी होणार आहे. या निर्णयामुळे निर्यातदार असतील किंवा आयातदार यांना व्यवहार करताना कागदी बॉण्ड देण्याची गरज नाही. तसेच या इलेक्ट्रॉनिक बॉण्डची ऑनलाईनच पडताळणी कस्टम अधिकारी करणार आहेत. या निर्णयामुळे अधिक पारदर्शक येणार असून व्यवहाराची प्रक्रिया सोपी होईल. तसेच या प्रक्रियेमुळे कागदपत्रांसाठी जाणारा वेळ आता वाचणार आहे.
इलेक्ट्रॉनिक बॉण्डचे फायदे काय?
ई-बॉण्ड प्रणालीच्या माध्यमातून आता मुद्रांक शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच आता ५०० रुपयांचे शुल्क ऑनलाईन जमा करता येणार आहेत. या बरोबरच आयातदार किंवा निर्यातदार आणि कस्टम अधिका-यांच्या यावर आता ई-स्वाक्षरी असणार आहे. एवढेच नाही तर या प्रणालीच्या माध्यमातून कस्टम अधिका-यांकडून तत्काळ पडताळणी देखील होणार आहे.





