निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची तुरूंगात रवानगी

पाटणा – जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सोमवारी उपोषणस्थळी अटक करण्यात आली. बिहार पोलिसांनी ती कारवाई केली. किशोर यांच्या ४३ समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले.
मागील महिन्यात बिहार लोकसेवा आयोगाने घेतलेली एक परीक्षा वादग्रस्त ठरली. प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करत अनेक परीक्षार्थींनी संबंधित परीक्षेवर बहिष्कार टाकला. त्यांनी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत किशोर यांनी पाटण्यातील गांधी मैदानावर बेमुदत उपोषण आरंभले.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली. प्रतिबंधित क्षेत्रात उपोषण केले जात असल्याने ते अवैध असल्याचे कारण देत पोलिसांनी कारवाई केली. त्या कारवाईच्या माध्यमातून किशोर आणि त्यांच्या समर्थकांना उपोषणस्थळावरून हटवण्यात आले.
पोलिसांनी किशोर यांना धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. मात्र, पोलिसांनी तो फेटाळला. किशोर यांना अटक करण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याने त्यांच्या समर्थकांना हटवण्यात आले, असे पोलिसांनी नमूद केले. अटकेनंतर किशोर यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाटणा एम्समध्ये नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशांत किशोर यांची तुरूंगात रवानगी
अटकेनंतर किशोर यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, तो स्वीकारण्यास नकार दर्शवल्याने किशोर यांची रवानगी तुरूंगात झाली. किशोर यांनी तुरूंगात नेण्याआधी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. जामीन मंजूर केल्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. मात्र, पुन्हा कधीच अवैध आंदोलनाचा भाग बनणार नाही अशी लेखी हमी माझ्याकडे मागण्यात आली. त्यामुळे मी मंजूर झालेल्या जामिनाचा स्वीकार करू शकत नाही. तुरूंगातही माझे उपोषण चालू राहील. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.





