राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक; कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये जयशंकर, ओब्रायन यांचा समावेश

नवी दिल्ली -राज्यसभेचे 10 सदस्य त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने 28 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार, 24 जुलैला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तासाभराने म्हणजे सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. निवृत्त होणारे सदस्य गुजरात, गोवा आणि पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांचा समावेश आहे.
जयशंकर, जुगलसिंह लोखंडवाला आणि दिनेशचंद्र अनावडिया या गुजरातमधून निवडून गेलेल्या भाजप सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. गोव्याचे भाजप सदस्य विनय डी. तेंडुलकर यांचाही कार्यकाळ संपत आहे. ओब्रायन यांच्यासह डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर राय हे बंगालचे तृणमूल सदस्यही रिटायर होत आहेत.
ऑगस्टमध्ये कॉंग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचाही कार्यकाळ संपेल. त्याशिवाय, तृणमूलचे लुईझिन्हो फलेरो यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त आहे. बंगालमधून निवडून द्यावयाच्या त्या जागेसाठीही 24 जुलैलाच पोटनिवडणूक होईल.





