निवडणूक आयोगाची स्वत:लाच क्लीन चिट; कॉंग्रेसची टीका

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील अनियमिततांचे आरोप फेटाळणाऱ्या निवडणूक आयोगावर कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला. आयोगाने स्वत:लाच क्लीन चिट देण्यात कुठले आश्चर्य नाही, अशी कडवट टिप्पणी त्या पक्षाने केली. हरियाणात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने त्या राज्याची सत्ता राखली.
मात्र, त्या निवडणूक काळातील आणि प्रामुख्याने मतमोजणीसंदर्भातील काही अनियमिततांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) बॅटरींच्या चार्जिंगचे प्रमाण विसंगत असल्याची तक्रार त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवली. ज्या बॅटरी अधिक प्रमाणात चार्ज होत्या; तिथे आमचे उमेदवार पराभूत झाले. तर, ज्या बॅटरी कमी प्रमाणात चार्ज होत्या; तिथे आमचे उमेदवार विजयी झाले, असे कॉंग्रेसने तक्रारीत नमूद केले.
मात्र, निवडणूक आयोगाने अनियमिततांसंदर्भात कॉंग्रेसने केलेले आरोप निराधार म्हणत फेटाळून लावले. त्यानंतर कॉंग्रेसच्या ९ ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पलटवार केला. इव्हीएमच्या बॅटरींबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तर स्पष्टीकरण देणारे नव्हे; तर आणखी संभ्रम निर्माण करणारे होते. निवडणूक आयोग विशिष्ट तक्रारींची दखल घेणार नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले.





