Election 2026 : “पैसे वाटताना दिसलात तर तिथेच त्याला बदडून काढणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा

Election 2026 : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना मॅनेज करून पैसे वाटप केले जात आहेत. पैसे वाटताना मला कोणी भेटले तर तिथेच त्याला बदडून काढणार, असा थेट इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. आत्तापासूनच पैसे घेऊन मत विकत घेतली जात आहेत, असा गंभीर आरोपही चंद्रकात खैरे यांनी केला आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिले जाते. यंदा प्रथमच येथील निवडणुकी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिंदेसेना व भाजपकडून उद्धवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
तर, भाजप आणि शिंदेसेना पैसा आणि सत्तेच्या जोरावर ही निवडणूक लढवत असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते करत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बीड दौऱ्यावर असतानाही मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बावनकुळे हे इलेक्ट्रिक कंत्राटदार
निवडणूकीच्या मुद्द्यांवरुन शाब्दिक युद्ध देखील रंगले आहे. खैरे यांनी मंत्री बावनकुळेंवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बावनकुळे इलेक्ट्रिक कंत्राटदार होते. गडकरींनी त्यांना आणले आणि आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. बावनकुळे नेते बदलू माणूस, त्याला काहीही माहित नाही नसते, असे आरोप खैरेंनी केला.





